पुणे : केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’मध्ये पुणे देशात दहाव्या स्थानी आले आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहराने हा क्रमांक मिळवला. गेल्या वर्षी पुणे २३ व्या क्रमांकावर होते.
केंद्र सरकारच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. देशपातळीवरील अनेक मोठी शहरे यामध्ये सहभागी झाली होती. या सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम क्रमांक पटकविला. मध्य प्रदेशातीलच जबलपूर शहराने दुसरा क्रमांक, तर उत्तर प्रदेश येथील आग्रा आणि गुजरात येथील सुरत यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला. या सर्वेक्षणात वायू गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात येते.
या सर्वेक्षणात १३० हून अधिक शहरांचा समावेश होता. हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, औद्योगिक उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ नियंत्रण, सार्वजनिक जागरूकता, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर शहरे तपासण्यात आली.
देश पातळीवर झालेल्या या स्पर्धेत पुण्याने १८६ गुण मिळवले असून, अंतिम गुणांकनात ते अहमदाबाद आणि नागपूरसह दहाव्या क्रमांकावर आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, कचरा जाळण्यामुळे होणारे उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, बांधकाम पासून निर्माण होणारे प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, इतर प्रदूषण, याबाबत नागरिकांमध्ये कशा पद्धतीने जनजागृती केली जाते. या मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले.
एप्रिल २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत हे सर्वेक्षण केले जात होते. पुणे महापालिकेकडून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना प्रवृत्त केले जात आहे. याशिवाय, महानगरपालिकेने नवीन खरेदी केलेली आणि भाड्याने घेतलेली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. पुणे शहरात जुलै २०२५ पर्यंत ४१ लाख १६ हजार ३१० नोंदणीकृत वाहने रस्त्यावर होती. पुणे शहरात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात ७० टक्के रोड हे ग्रीन बेल्ट वर्गातील आहेत. शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला १५ वित्त आयोग अंतर्गत ३९९ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी १६२ कोटी रुपये मिळाले आहेत. यातून पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने वर्षभर विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी घंटागाड्या, बसेस तसेच इलेक्ट्रिक वाहने, पीएमपीएमएल बस यांचा समावेश आहे. स्मशानभूमीमध्ये गॅस तसेच विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे, असेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी सांगितले.