पुणे-अहमदनगर रस्त्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या अपघातामध्ये इतर पाचजण जखमी झाले आहे. एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शिक्रापूरजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर हा अपघात उघडला. शिक्रापूर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शिक्रापूरपासून सहा किलोमीटरवर हा अपघात झाला. रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून ट्रक बाजूच्या मार्गिकेमध्ये घुसला आणि त्याने समोरुन येणाऱ्या गाड्यांना धडक दिली.

“दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला गेलेल्या ट्रकने आधी समोरुन येणाऱ्या एका एमयुव्हीला धडक दिली. या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. त्यानंतर या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये गाडीमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर उपचार सुरु आहे. दुचाकीवरील जोडप्याचाही मृत्यू झालाय. दरम्यान ट्रकने ज्या गाडीला धडक दिली तिला मागून दुसऱ्या एका दुचाकीनेही धडक दिल्याने त्यावरील दोघेही जखमी झालेत,” अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रणजीत पाथरे यांनी दिलीय.

मरण पावलेल्यांपैकी तिघांची नाव समोर आली आहेत. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा हिंगाडे, लीना नीकसे अशी मृतांपैकी तिघांची नाव असून अन्य दोघांची नावे समजू शकलेली नाहीत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना अपघाताबद्दल कळवण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणामध्ये ट्रक चालकाविरोधात वेगाने गाडी चालवणे, बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरणे या अंतर्गत शिक्रापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.