पुणे : विद्यार्थ्यांना प्रश्नांचे नीट आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन भाषांत करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला. त्यानंतर आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाही स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एआयसीटीईने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.

सांस्कृतिकदृष्ट्या विविधता असलेल्या भारतासारख्या देशात भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही. भाषा ही समाजाची ओळख आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये मातृभाषेचा वापर करण्यावर, शैक्षणिक साहित्याची मातृभाषेतून निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील शिक्षणामध्ये क्रांती घडवण्याची संधी निर्माण झाली आहे. अन्य भाषांवर प्रभुत्व न येणाऱ्या लोकांसाठी भारतीय प्रादेशिक भाषा संवादाचे माध्यम आहे. मातृभाषेतून शिक्षणाचा मोठा फायदा होतो. भारतीय भाषेतील अध्यापन सांस्कृतिक आणि शैक्षणिककृष्ट्या समावेशित होऊ शकते. त्याद्वारे सर्व विद्यार्थी एका स्तरावर येतील. या विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोनामुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये सहजपणे माहितीची देवाणघेवाण होऊ शकते.

हेही वाचा : पुणे : महापौर बंगल्यातील जलमापक शोभेसाठी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अनुषंगाने शिक्षकांनी अध्यापनामध्ये स्थानिक भाषेचा वापर अधिकाधिक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य, संचालकांना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एआयसीटीईने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका स्थानिक भाषेसह दोन भाषांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता विद्यार्थी-शिक्षक संवादामध्येही स्थानिक भाषेचा वापर वाढवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.