पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अतिखराब नोंदविण्यात आली आहे. सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्प हिंजवडी, वाकड परिसरात असल्याने तिथे हवा सर्वाधिक खराब आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनविकाराचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक रविवारी दुपारी ४ वाजता ३०५ वर पोहोचला. वाकडमधील भूमकर चौकात ही नोंद करण्यात आली. ही हवेची अतिखराब पातळी मानली जाते. त्याखालोखाल पुण्यातील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक २४४ वर नोंदविण्यात आला. त्यानंतर पाषाणमधील पंचवटी १२१, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ११६, निगडी १०८ आणि हडपसर ८८ अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. पुण्यात हडपसर परिसरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक असून, पाषाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि निगडीत हवेची गुणवत्ता मध्यम आहे. याचवेळी म्हाडा कॉलनीत हवेची गुणवत्ता खराब आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, हिंजवडी परिसरात हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे. या परिसरातील खराब हवेमुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे. त्यातच कचरा जाळण्याचे प्रकार घडत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने या प्रकरणी पावले उचलून प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. हिंजवडी परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक – हवेची गुणवत्ता – त्रास

० ते ५० – चांगली – हवेचा कोणताही वाईट परिणाम आरोग्यावर नाही.

५१ ते १०० – आधीपासून श्वसनविकार असलेल्या रुग्णांना किरकोळ त्रास.

१०१ ते २०० – मध्यम – फुफ्फुस, दमा, हृदयविकार असलेल्या रुग्णांना श्वसनास त्रास.

२०१ ते ३०० – खराब – दीर्घकाळ या हवेच्या संपर्कात राहिल्यास निरोगी नागरिकांना श्वसनास त्रास.

३०१ ते ४०० – अतिखराब – निरोगी नागरिकांना दीर्घकाळ या हवेच्या संपर्कात राहिल्यास श्वसनविकाराचा धोका.