पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील रेनबो हाॅटेलच्या पोटमाळ्यावर बेकायदा बांधकाम करून बांधकाम नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी ‘एल थ्री’ बारच्या मालकासह चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महापालिकेकडून तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी लिक्वीड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनिगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक रवी माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री) यांच्याविरुद्ध एमआरटीपी ॲक्ट १९६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे महापालिकेचे इमारत निरीक्षक राहुल अजित रसाळे (वय ४३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फर्ग्युसन रस्त्यावरील रेनबो हाॅटेलच्या पोटमाळ्यावर जागा मालक कामठे, चालक माहेश्वरी यांनी ‘एल थ्री’ बार सुरु केला होता. याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कामठे आणि माहेश्वरी यांना २८ मे रोजी नोटीस बजाविली होती. याबाबत १५ दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते.

हेही वाचा – पालखी सोहळ्यासाठी देहू-आळंदी मार्गावरील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

कामठे आणि माहेश्वरी यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. त्यानंतर मंगळवारी (२५ जून) दुपारी दोनच्या सुमारास उपअभियंता बांधकाम विभाग सुनील कदम, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, अतिक्रमण विभागाचे चंद्रकांत कदम आणि कर्मचाऱ्यांनी तेथे कारवाई केली. एल थ्री बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखबंद (सील) लावले होते. याबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन तात्पुरते सील काढण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक धवल गोळेकर यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. रेनबो हाॅटेलमधून एल थ्री बारमध्ये जाण्यास एक जिना होता. पोटमाळ्यावर बार तयार करण्यात आला होता. तेथे बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. तेथील बांधकाम तोडून टाकण्यात आले, असे इमारत निरीक्षक रसाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एल थ्री बारमधील पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी जागा मालक कामठे, माहेश्वरी यांच्यासह आठजणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पार्टीत मेफेड्रोनचे सेवन करणारे नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई), करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) यांना अटक केली. ठोंबरेने मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात उघडकीस आले.