पुणे : दरवर्षी पावसाळ्यामध्ये शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर येतो. खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडल्यानंतर पाण्याखाली जाणारा पहिला पूल अशी ओळख डेक्कन भागात असलेल्या बाबा भिडे पुलाची आहे. गेल्या काही वर्षांपासून हा पूल प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जात असल्याने केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या भिडे पुलाची ख्याती पसरलेली आहे. या पुलावर नागरिकांच्या तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेच्या वतीने बसवलेले संरक्षक कठडे गेल्या काही महिन्यांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

डेक्कन जिमखाना चौकातून नारायण पेठेकडे जाण्यासाठी बाबा भिडे पुलाचा वापर केला जातो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून देखील या पुलाचा वापर केला जातो. मात्र नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. पण सध्या हे कठडेच नसल्याने नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होण्याआधी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन भिडे पुलाला बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे काढून ठेवते. पण आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरही हे संरक्षक कठडे लावण्यात आलेले नाहीत. याशिवाय मेट्रोच्या कामामुळे बाबा भिडे पुलाशेजारी दोन मोठे खांब तयार केले आहेत. त्यामुळे वाहन चालक व पादचारी यांच्यावर कोणत्याही वेळेस अनुचित प्रकार घडून जीवितहानी होऊ शकते.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी?

दिवाळीच्या उत्सवात नदीपात्रात फटाक्यांचे असंख्य स्टॉल सुरू करण्यात आले होते. यातील बहुतांश फटाका स्टॉलचालकांनी स्टॉल उभारण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या काळात नदीपात्रामध्ये अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. दुचाकी तसेच चार चाकी वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे गायब असल्याने या भागातून जाताना आणि येताना वाहनचालक पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाळा संपल्यानंतर पुलावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी कठडे पालिकेने बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे हा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करावे. या भागात काही अनुचित प्रकार घडल्यानंतर प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…

बाबा भिडे पुलावर बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे गायब झाले आहेत. तसेच नदीपात्राच्या जवळ मेट्रो प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या दोन खांबामुळे तेथे सुरक्षिततेसाठी बॅरिकेट लावण्यात आलेले आहेत. मात्र यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार की नाही.

अनिल अगावणे (स्थानिक रहिवासी, नारायण पेठ)

भिडे पुलावर बसविण्यात आलेले संरक्षक कठडे पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाऊ नये, यासाठी काढून ठेवले जातात. मध्यंतरी ते बसविण्यात येणार होते. मात्र हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने हे काम थांबले होते. आता हे लवकरात लवकर बसविले जातील.

सुहास जाधव, सहायक महापालिका आयुक्त, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार तरी कधी?

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते वडगाव उड्डाणपुलाच्या दरम्यान वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कालवा रोडवरून वाहतूक सुरू झाली असली तरी सिंहगड रस्त्यावरील कोंडी कमी झालेली नाही. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पुढील वर्षाच्या अखेर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे वाटत नाही.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!

सिंहगड रोडवरील मेट्रो मार्गाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल आणि मेट्रो अशी दुहेरी सोय उपलब्ध होऊन सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे. मात्र या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे आणखी वर्षभर तरी या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे हे निश्चितच आहे.

मकरंद जोशी, सिंहगड रोड

तुम्हीही मांडा गाऱ्हाणे…

तुमच्या भागात, क्षेत्रीय कार्यालयातील नागरी समस्या तुम्ही या सदरासाठी पाठवू शकता. त्यासाठी ई-मेल आयडी : lokpune4 @gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(समन्वय : चैतन्य मचाले)