पुणे : भवानी पेठेतील एका सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि दागिने असा ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला.
याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भवानी पेठेतील चुडामण तालीम परिसरात राहायला आहेत. शनिवारी (३१ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या सदनिका बंद करून बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ऐवज लांबविला. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचारी शशिकांत तुळसुलकर तपास करत आहेत.
उन्हाळी सुटीत अनेकजण सहकुटुंब परगावी जातात. सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करून चोरटे घरफोडीचे गुन्हे करतात. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोथरूड भागातील भुसारी काॅलनीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १७ लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती.