पुणे : अपघातात अपंगत्व आलेल्या दुचाकीस्वारास एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश माेटार अपघात न्यायाधिकरणाने दिला. दोन वर्षांपूर्वी चिंचवड भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. अपघातात त्याला अपंगत्व आले होते. याप्रकरणी मोटार अपघात न्यायाधिकरणात दुचाकीस्वाराने नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता.
अपघातात त्याला ७८ टक्के अपंगत्व आले होते. ७ फेब्रुवारी २०२२ राेजी तक्रारदार तरुण पत्नीसह दुचाकीवरून चिंचवड परिसरातून निघाले होते. त्या वेळी एका मोटारीने त्याला धडक दिली होती. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांसाठी १६ लाख रुपये खर्च झाला होता. तरुण एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला दरमहा ६० हजार रुपये वेतन मिळत होते. अपघातात ७८ टक्के अपंगत्व आले होते. त्यामुळे भविष्याचा प्रश्न होता. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाने एक कोटी २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्यासाठी खासगी विमा कंपनी विरोधात मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. हे प्रकरण प्रलंबित राहण्याऐवजी मध्यस्थीमार्फत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले.
मध्यस्थी अधिकारी ॲड. अतुल गुंजाळ यांच्या प्रयत्नातून अर्जदार आणि विमा कंपनी यांच्यात समझोता झाला. त्यानुसार दुचाकीस्वार तरुणास एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे ठरविण्यात आले. दुचाकीस्वार तरुणाच्या वतीने ॲड. कांतिलाल सोनावणे, ॲड. सी. एस. पाटील, ॲड. पूनम बोरसे यांनी बाजू मांडली. मध्यस्थीमुळे न्यायालयीन खटला लांबला नाही. वेळ आणि खर्चाची बचत झाली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनातून मध्यस्थीची प्रक्रिया यशस्वी झाली.