पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृतानंजन ते खंडाळा बोगद्यादरम्यान ओव्हरगेड गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी दुपारी पूर्ण झाले. द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारी १२ ते २ दरम्यान बंद करण्यात आली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाने लोणावळ्याकडे वळविण्यात आली. या कामामुळे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वाहतूक नियमभंग करणारे वाहनचालक या यंत्रणेद्वारे टिपले जाणार आहेत. या यंत्रणेद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना त्वरित दंड पाठविण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनक्रमांकाच्या पाटीवरील क्रमांकावरून वाहनचालकांना दंडाचा संदेश मोबाइलद्वारे मिळणार आहे.
हेही वाचा – भाजपा आमदार अश्विनी जगताप यांचा रौद्रावतार, म्हणाल्या, “माझ्या नादी लागू नका…”
हेही वाचा – ‘ससून’च्या अधिष्ठात्यांना आमदार धंगेकर धारेवर धरतात तेव्हा…
द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृतानंजन ते खंडाळा बोगद्यादरम्यान ओव्हरहेड गॅन्ट्री (लोखंडी खांब) बसविण्याचे काम मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात आले. त्यासाठी द्रुतगती मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास थांबविण्यात आली होती. खालापूर टोलनाक्याजवळ अवजड वाहने थांबविण्यात आली होती. पुण्याकडे जाणारी हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. दुपारी दोननंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.