पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे पाच दिवसांपूर्वी आलिशान कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची घटना होऊन काही तास होत नाही तोवर अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला. तर मुलाच्या वडिलांसह अन्य पाच आरोपींना (२४ मे) आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

अल्पवयीन आरोपी मुलाला काही तासात जामीन मिळाल्याने, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केल्यावर, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करित १४ दिवसांकरीता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन मुलास मदत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई करावी. तसेच यामध्ये कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण झालं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली देखील याच अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. तर आज अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांची कोठडी संपल्याने त्या सर्वांना पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.

आणखी वाचा-पुणे पोर्श कार अपघातावर अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी पालकमंत्री म्हणून…”

त्यावेळी सरकार पक्षाकडून युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोणा-कोणाला कॉल केले. या करिता तज्ज्ञाकडून मोबाईल तपासून घ्यायचा आहे. घरून अल्पवयीन आरोपी मुलगा किती वाजता बाहेर पडला. याकरीता गेटवरील रजिस्टर ताब्यात घ्यायचे आहे. ४७ हजार रुपयांच बिल ऑनलाईनद्वारे भरलेले आहे. त्या खात्याची माहिती अद्याप घेतलेली नाही. या सर्व तपासासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली.

त्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हणाले की, अपघाताच्या घटनेच्या पहिल्या दिवसापासून चालक तपासाठी उपलब्ध आहे. १७५८ रुपये आरटीओची फी भरली नाही. त्यामुळे ४२० चे कलम लावण्यात आले आहे. हे टाडा, मोकाची देखील कलम लावतील. ते योग्य आहे का? आतापर्यंत आरटीओ काय करत होते? गाडी कधी घेतली? आरोपींकडे कागदपत्रे होती. त्यामुळे पोलिसांना कळले की टॅक्स भरला नाही. मग आता कोणती कागदपत्रे हवी आहेत. गाडीशी संबधीत सर्व कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. अल्पवयीन मुलाचे वडिलांना अटक करण्यापूर्वी नोटीस देणे आवश्यक होते. मात्र ती नोटीस न देता अटक करण्यात आली असल्याच बचाव पक्षाचे वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.