पुणे : चंदननगर भागातील एका सराफी दुकानात शिरून चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सराफी पेढीतून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर, त्याच ठाण्याच्या हद्दीत सराफी पेढीच्या मालकाला धमकावून ही लूटमारीची घटना घडली.

याबाबत सराफी पेढीच्या मालकाने चंदनगनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील साईनाथनगर भागात एक सराफी पेढी आहे. सराफी पेढीचे मालक शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पेढीत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेले चोरटे सराफी पेढीत शिरले. त्यांनी चेहरे रुमालाने झाकले होते. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवला. पेढीतील तीन ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या घेतल्या. सराफी पेढीच्या मालकांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करून चोरट्यांच्या अंगावर स्टूल फेकून मारले. चोरटे दुचाकीवरून वेगात पसार झाले.

दरम्यान, आरडाओरडा ऐकून नागरिकांनी सराफी पेढीत धाव घेतली. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदननगर भागातील साईनाथनगर परिसर गजबलेला आहे. खराडी बाह्यवळण मार्गाजवळ साईनाथनगर आहे. तेथेच ही घटना घडली.

विशेष म्हणजे, चंदननगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. उद्घाटनानंतर त्याच ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी साईनाथनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

वारजे भागात भरदिवसा घरफोडी

वारजे भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पात राहायला आहेत. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील चार लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.