पुणे : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. शहर आणि उपनगरात जोर’धार’ सुरू झाली असून, घाटमाथ्यावरील लोणावळा, ताम्हिणी या भागांनाही पावसाने झोडपले आहे.
मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जूनमध्ये पुणे जिल्ह्यात पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. मात्र, जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. यंदा जूनमध्ये शिवाजीनगर येथे २६७.५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे हवामान विभागाच्या २०१४ पासूनच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, यंदा जूनमध्ये शहरात पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला. ताम्हिणी येथे तर चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. मात्र, जुलै महिना सुरू झाल्यापासून शहरासह घाटमाथा परिसरातही पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, सोमवारी रात्रीपासून घाटमाथा परिसरात, शहर आणि अन्य भागांत मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार घाटमाथ्याच्या परिसरातील सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे ९० मिलीमीटर, ताम्हिणी येथे १९०, कुरवंडे येथे ९६.५, भोर येथे ५६ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. आज घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असून, यलो अलर्टही देण्यात आला आहे. तर सकाळी दहा वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ६.९ मिलीमीटर, लवळे येथे १२, लोहगाव येथे ८.८, पाषाण येथे ५.४ मिलीमीटर पाऊस पडला. हवामान विभागाने पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, मोसमी वाऱ्यांची तीव्रता काही प्रमाणात वाढल्याने पाऊस पडत आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वगळता अन्य प्रणाली सक्रिय नाही.