पुणे : सहकारी गृहरचना संस्थांची मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी येत्या शनिवार ते बुधवार (२७ ते ३० सप्टेंबर) पूर्व तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय सह जिल्हा निबंधक कार्यालयाने घेतला आहे. ‘सेवा पंधरावडा’ उपक्रमाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘डीम्ड कन्व्हेयन्स’साठी शुल्क निश्चितीही केली जाणार असून, मोहिमेअंतर्गत कागदपत्रांची तपासणी, सोसायट्यांच्या असलेल्या विविध शंकाचे निरसन करण्यात येणार आहे.
‘सेवा पंधरवड्यांतर्गत ‘डीम्ड कन्व्हेयन्स’साठीच्या विविध कामांना विलंब लागू नये, यासाठी सहजिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयाने अभिनिर्णयपूर्व तपासणी पद्धत सुरू केली आहे. त्यात सहकार विभागाकडील ‘डीम्ड कन्व्हेयन्स’चे आदेश तसेच दस्ताचा मसुदा अंतिम होण्यापूर्वी या कार्यालयाकडे संपर्क साधता येईल, अशी माहिती जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
ज्या सहकारी गृहरचना संस्थांना संबंधित जमीन मालक किंवा विकसकांनी जमीन आणि इमारतीचे खरेदीखत करून दिले नाही त्यांना महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम १९६३ निसार, सक्षम प्राधिकाऱ्यांकडून डीम्ड कन्व्हेयन्स करून मिळण्याचा कायदेशीर मार्ग यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
अनेकदा सहकारी गृहरचना संस्था ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अभिनिर्णयासाठी पाठपुरावा करतात. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने किंवा ती उपलब्ध करून घेण्यात संस्थेचा वेळ गेल्यामुळे ‘डीम्ड कन्व्हेयन्स’च्या दस्ताचे मुद्रांक शुल्क अंतिम होण्यास कालावधी लागतो. त्यामुळे त्या दस्ताची नोंदणी होणे, मिळकतपत्रिकेवर संस्थेचे नाव लागणे, पुनर्विकास करणे आदी कामे अडकून पडतात. त्यासाठी ही मोहीम उपयुक्त आहे,’ असे हिंगाणे यांनी स्पष्ट केले.
सहभाग २६ सप्टेंबरपूर्वी नोंदविणे आवश्यक
ही मोहीम २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान फोटोझिंको प्रेसच्या मागे असलेल्या सहजिल्हा निबंधक वर्ग एक यांच्या कार्यालयात सुरू राहील. सकाळी १०.३० ते सायंकाळी साडेपाचदरम्यान सहकारी संस्थांना कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. या काळात दररोज २५ ते ३० संस्थांची कागदपत्रे तपासण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे संस्थांनी २६ सप्टेंबरपूर्वी पुणे शहर कार्यालयात समक्ष किंवा jdr.punecity@gmail.com या ई-मेलवर सहभाग नोंदविणे आणि वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. सहभाग नोंदविण्यासाठी संस्थेचे नाव, पत्ता, सहभागी होणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक कळविणे आवश्यक आहे.