पुणे : विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात बंडखोरी करून काँग्रेस उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करणाऱ्या माजी महापौर कमल व्यवहारे यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने गुरुवारी घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची वैचारिक निष्ठा काँग्रेसशी नाही. ते पक्ष सोडतील, हा त्यांचा आक्षेप खरा ठरल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत व्यवहारे यांनी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी पक्षाच्या नेत्यांकडे केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारून सध्या शिवसेनेते (शिंदे) गेलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. धंगेकर यांच्या उमेदवारीला व्यवहारे यांनी आक्षेप घेतला होता. धंगेकर यांची वैचारिक निष्ठा काँग्रेसबरोबर नाही. ते कधीही पक्ष सोडतील, असे सांगून त्यांनी कसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेसने व्यवहारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे निलंबन केले होते. या दरम्यान, कसबा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला होता.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील जुन्या-जाणत्या, अनुभवी, निष्ठांवत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी प्रदेश पातळीवरून संवाद साधण्यात आला. त्यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुढाकारातून माजी महिला प्रदेशाध्यक्ष, माजी महापौर कमल व्यवहारे यांचे निलंबन मागे घेण्याचा निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत व्यवहारे यांचे निलंबन मागे घेण्यात आले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागात व्यवहारे यांना मानणारा मोठा मतदार आहे. बँकिंग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवहारे यांची सर्व राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातच झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंग कारवाई मागे घेण्यात आली. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
काँग्रेसमधून राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. पक्षाचे विचार आणि संघटनेसाठी कार्यरत राहणे कायम आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळावे, म्हणून काम करण्याचा संकल्प करून मी पुन्हा पक्षात सक्रिय होत आहे. – कमल व्यवहारे, माजी महापौर.