पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी ‘आयर्नमॅन’ किताब पटकावला आहे. कझाकीस्तान येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. आयपीएस  कृष्ण प्रकाश हे गोमारे यांचे प्रेरणास्थान असून त्यांच्यामुळेच आयर्नमॅन होण्याचं स्वप्न बाळगल्याचं गोमारे यांनी सांगितलं आहे. अवघ्या एका वर्षात तयारी करून त्यांनी हे यश मिळवलं आहे. अत्यंत खडतर मानली जाणारी स्पर्धा ११ तास ५० मिनिटांत गोमारे यांनी पार केली. 

हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या राम गोमारे यांनी कझाकीस्तान येथे झालेल्या स्पर्धेत ११ तास ५० मिनिटात धावणे (मॅरेथॉन), सायकलींग, पोहणे हे अंतर पार करून हा आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे. अत्यंत खडतर असलेल्या या स्पर्धेत गोमारे यांनी स्विमिंग ३.८ किलोमीटर १ तास ३६ मिनिटात, १८० किलोमीटर सायकलींग हे ५ तास ४० मिनिटात तर ४२ किलोमीटरची मॅरेथॉन ४ तास १५ मिनिटं असे एकूण ११ तास ५० मिनिटात ही स्पर्धा पार केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगातील अनेक देशातल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १६ तास ३० मिनिटात ही स्पर्धा पार करायची असते. असं असतांना गोमारे यांनी अवघ्या ११ तास ५० मिनिटात बाजी मारली आहे. तरुणांनी वेळात वेळ काढून दिवसातून एक तास व्यायाम करायल हवा अस गोमारे यांनी आवर्जून सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी खडतर मेहनत घेतली होती. पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्यापासून प्रेरणा घेत स्पर्धेसाठी तयारी केली. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले असं गोमारे यांनी सांगितलं आहे. स्पर्धा जिंकून आल्यानंतर राम यांनी त्यांच्या आईच्या गळ्यात मेडल घातलं.स्पर्धेसाठी पत्नीची आणि मित्रांची देखील मोलाची साथ होती असं गोमारे यांनी सांगितलं. पुढील उद्दिष्ट ‘अल्ट्रा आयर्नमॅन’ चं असल्याचं राम गोमारे यांनी सांगितलं आहे.