पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार भाडेकरुच्या ताब्यातून सदनिकेचा ताबा मिळवून दिल्यानंतर सदनिका मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या न्यायालयातील लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात अलाा आहे.
याप्रकरणी न्यायालयातील लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार आणि भुसारी हे भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात नियुक्तीस आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदारांची सिंहगड रस्ता भागातील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत सदनिका आहे. त्यांनी भाडेतत्त्वावर सदनिका दिली होती. भाडेकरु सदनिकाचा ताबा सोडत नसल्याने तक्रारदाराने याबाबत भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता.
न्यायालयाने तक्रारदााच्या बाजून निकाल देऊन भाडेकरुला त्वरीत ताबा सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी न्यायालयातील लिपिक रवींद्र पवार, अमित भुसारी यांना नेमण्यात आले होते. न्यायालयीन आदेशाची पूर्तता करुन तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यासाठी दोघांनी तक्रारदारांकडे ४० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने २१ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांनी तडजोडीत ३५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर शुक्रवारी (२७ जून) लिपक पवार आणि भुसारी यांनी न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता केली. तक्रारदाराच्या ताब्यात सदनिका दिली. ही कारवाई पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराला सिंहगड रस्त्यावरील एका उपाहारगृहात पवार आणि भुसारी यांनी बोलाविले. उपहारागृहाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या पवार आणि भुसारी यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.