पुणे : एटीएम गॅस कटरने कापून रोकड चोरण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कंटेनर, एटीएम कापण्यासाठी लागणारे गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी, पहार, दोरी असा १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुतूबुद्दीन अख्तर हुसेन (वय ३१, राजस्थान), यसीन हारून खान (वय ३२) राहुल रशीद खान (वय ३२, दोघे रा. हरयाणा)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. हरयाणा आणि राजस्थानमध्ये एटीएम फोडून रोकड चोरी करणारी टोळी पुणे जिल्हयात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरट्यांची टोळी पुणे-नगर रस्त्यावरील सरहदवाडी गावाजवळ एका ढाब्याच्या परिसरात थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मदतीने कारवाई केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, हनुमंत गिरी, तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव, प्रफुल्ल भगत, विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, निखिल रावडे यांनी ही कामगिरी केली. चोरट्यांच्या टोळीने राज्यात कोठे एटीएम फोडून रोकड चोरीचे गुन्हे केले आहेत का ? , यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.