पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून गेल्या १२ वर्षांत २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंदेकर टोळीसाठी खंडणी गोळा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा १५ ते २० हजार रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्देकर, सागर बाळकृष्ण थोपटे, रोहित सुधाकर बहाद्दुरकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मासळी बाजारातून खंडणी उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आले आहे. आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पोेलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध ‘मकोका’ कारवाई केली. आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी मिळाली, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू याच्यासह साथीदाराचे बँक खाते गोठविण्यात आले. बँक खात्यात ५० लाखांची रोकड आढळून आली. तसेच, आंदेकरच्या घरातून ७७ तोळे सोने दागिने, मोटार, जमीन व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

गणेश पेठ मासळी बाजारातून आंदेकर टोळी प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा १५ ते २० हजार रुपयांचा हप्ता वसूल करण्यात येत होता. या प्रकरणी आंदेकरसह अकरा जणांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आंदेकर टोळीसाठी वसूली करणाऱ्या अंकुश, वर्देकर, थोपटे, बहाद्दुरकर यांना अटक करण्यात आली.

मासळी बाजारातून ६० ते ६५ तक्रारी

मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून दरमहा हप्ता गोळा करण्यात येत होता. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी मासळी बाजारातील विक्रेत्यांना तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मासळी बाजारातून ६० ते ६५ विक्रेत्यांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या.

प्राप्तिकर विभागाशी संपर्क

बंडू आंदेकरने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली. आंदेकरने एकदाही प्राप्तिकर भरला नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आंदेकरविरुद्ध प्राप्तिकर विभागाकडून कारवाई होऊ शकते, त्या दृष्टीने विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नमूद केले.

महापालिकेकडून दुसऱ्या दिवशी कारवाई

आंदेकर टोळीने नाना पेठेत केलेल्या बेकायदा बांधकामांवर मंगळवारी पोलिसांनी महापालिकेच्या वतीने कारवाई केली. आंदेकर टोळीच्या नावाने थाटलेल्या टपऱ्या, कमानींवर कारवाई करण्यात आली.