पुणे: पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धक्का देऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सॅलिसबरी पार्क परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सॅलिसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. या भागातील एलआयसी काॅलनी परिसरातून ते बुधवारी रात्री आठच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांकडील दागिने, तसेच मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाणेर, बालेवाडी, ओैंध, सिंहगड रस्ता परिसरात पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या आहेत.

वारजे भागात भरदिवसा घरफोडी

वारजे भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पात राहायला आहेत. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील चार लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढीस लागले आहेत. अनेकजण कामानिमित्त सदनिका बंद करून बाहेर पडतात. चोरटे बंद सदनिकांची पाहणी करतात. सदनिकेचे कुलूप उचकटून ऐवज लांबवितात. ज्या सोसायटीत रखवालदार किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा सोसायट्यांमध्ये चोरटे शिरतात. शहराच्या मध्यभागाच्या तुलनेत उपनगरातील सोसायट्यांमध्ये घरफोडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. हडपसर, ओैंध, बाणेर, बालेवाडी, वाघोली, कोंढवा, सिंहगड भागात घरफोडीचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.