पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकासह तिघांची ३७ लाखांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला हडपसर-काळेपडळ परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. समाज माध्यमातील जाहिराती, तसेच चित्रफितींना दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते.

सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने महिलेने हे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम चाेरट्यांनी जमा केली. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी तिला अशा प्रकारच्या कामात (ऑनलाइन टास्क) पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १६ लाख ८४ हजार ८०० रुपये गुंतविले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेशी संपर्क साधणे बंद केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत.

नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी एकाची १२ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार घोरपडी गाव परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. परदेशात नोकरीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी तक्रारदाराला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १२ लाख ५७ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.

ज्येष्ठाच्या खात्यातून रोकड लंपास

ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी सहा लाख ३६ हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे वडील कोढवा भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यंनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत.