पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दौंड तालुक्यातील राहू गावातील शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून ६५ लाख ५७ हजार रुपये रोकड लुटणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा विशेष मोक्का न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली. याप्रकरणातील तीन आरोपींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच सात आरोपींना प्रत्येकी दहा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. चोरट्यांच्या टोळीने पुण्यासह सातारा, नगर जिल्ह्यातील बँकांवर दरोडा घातला होता.
टोळीप्रमुख सचिन आप्पा उर्फ अप्पासाहेब उर्फ भाऊसाहेब इथापे (वय २८, रा. चाळीसगाव, जळगाव, मूळ रा. कोंडे गव्हाण, श्रीगोंदा), रामदास उर्फ पप्पू उर्फ झिंगा उर्फ समीर यशवंत ढगे (वय २७, रा. चांबुर्डी, श्रीगोंदा), पृथ्वीराज उर्फ पतंग दत्तात्रय माने (वय २७), मारुती उर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय २३, दोघे रा. मानेवस्ती कन्हेरगाव, माढा) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपींना दरोडा टाकणे, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सतिश आप्पा इथापे उर्फ सतीश आप्पा पाटील (वय ३०), मंगल आप्पा इथापे (वय ४६) आणि प्रियंका ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे उर्फ प्रियंका दिपक देशमुख (वय २४) यांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
हे ही वाचा…पिंपरी: भोसरीतील कृत्रिम धावमार्ग पुन्हा बंद; आता किती दिवस राहणार बंद?
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राहू येथील शाखेवर ९ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी रात्रपाळीत सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडली. गॅस कटरने रोकड ठेवण्यात येणारा कक्ष (स्ट्राँग रूम) तोडून ६५ लाख ५७ हजार ४९५ रुपये लुटला होता. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उप अधीक्षक राजेंद्र मोरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. आठ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यातएकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्ा) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली. या खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपींच्या घरात वेगवेगळे मुखवटे, तलवारी, सुरे, विविध बँकांचे डेबीट कार्ड, बेकायदा मार्गाने खरेदी केलेल्या जमिनींची कागदपत्रे सापडली, असे सरकारी वकील साळवी यांनी युक्तिवादात सांगितले. पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.
हे ही वाचा…धोका वाढला! पुण्यात झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या शंभरवर पोहोचली
सामान्यांच्या ठेवींवर दरोडा
टोळीप्रमुख सचिन इथापे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून पुण्यासह सातारा, नगर जिल्ह्यातील बँकांवर दरोडे टाकले. त्या लुटीच्या रकमेतून त्याने चाळीसगाव येथे अनेक जमिनी, मिळकती, जेसीबी, चारचाकी वाहने खरेदी केली, तसेच टोळी सदस्यांची वेगवेगळ्या नावाने विविध बँकांमध्ये बनावट आधार कार्डांच्या साह्याने खाती काढली होती, असे तपासात निष्पन्न झाले होते. बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवी असतात. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपींनी दरोड्याच्या रकमेतून खरेदी केलेल्या मिळकती जप्त करून सरकार जमा करण्यात याव्यात, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींना शिक्षा सुनावली.