पुणे : ‘मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा,’ अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, कृषी, आरोग्य, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, नगर परिषद, पोलीस, महावितरण, वन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते.
‘जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित करून त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी, त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या आणि अन्य अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करावी, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा, धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल, याबाबत नियोजन करावे, तसेच सर्व धरणांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी,’ असे डुडी यांनी सांगितले.
‘सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक, तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पूल, रस्ते, पूरबाधित गावे आदींबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग आणि नागरिकांना द्यावी, पूरबाधित गावांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तालुकानिहाय रुग्णालये, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषध साठा तयार ठेवावा, साथीचे रोग आणि उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाने गावनिहाय पथके स्थापन करावीत, जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा,’ अशा सूचना डुडी यांनी केल्या.