पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचा गट आणि गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ७३ गट आणि १४५ गण असून, आराखड्यानुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी आठ सदस्य असणार आहे. त्यामुळे ७३ पैकी २४ सदस्य या तीन तालुक्यांत असणार आहेत.

तर सर्वांत कमी म्हणजे २ जिल्हा परिषद सदस्य संख्या ही वेल्हा तालुक्यात असणार आहे. या आराखड्यावर हरकती आणि सूचनांसाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रारूप आराखडा जाहीर झाल्याने आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील जिल्हा परिषदांच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून आराखड्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. त्यानंतर गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा १३ तहसील कार्यालयाबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली आहे. गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात कोणत्या गटात-गणात कोणते गाव आले आहे, हे स्पष्ट झाल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. समाविष्ट गावांमुळे हवेली तालुक्यातील सात गट कमी झाले आहेत. नवीन गटरचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ होती. सन २०१७ नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला.

तर उरुळी देवाची -फुरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्यांची सदस्य संख्या कमी होण्यावर झाला आहे. हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही १३ होती. आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्या ६ वर आली आहे. तर जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने वाढ झाली आहे.

सदस्य संख्या

तालुका – लोकसंख्या – जिल्हा परिषद सदस्यांची संख्या- पंचायत समिती सदस्यांची संख्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • जुन्नर- ३,७३,९८७ – ८ – १६
  • आंबेगाव- २,१४,१३ – ५ – १०
  • शिरूर- ३,४८,३०३ – ७ – १४
  • खेड- ३,५१,७६६ – ८ – १६
  • मावळ- २,४८,२८५ – ५ – १०
  • मुळशी – १,४९,२३५ – ३ – ६
  • हवेली- २,६०,८२३ – ६ – १२
  • दौंड- ३,३१,०४६ – ७ – १४
  • पुरंदर- १,८९,३२३ – ४ – ८
  • राजगड – ५४,५१६ – २- ४
  • भोर – १,६७,६६३ – ४- ८
  • बारामती- ३,१७,७४९ – ६- १२
  • इंदापूर- ३,५७,६६८ – ८ – १६
  • एकूण – ३३,४८,४९५ – ७३ – १४६

आराखडा हरकती – सूचनांसाठी जाहीर

हरकती आणि सूचनेसाठी हा आराखडा नागरिकांना खुला करण्यात आला आहे. त्यावर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती देण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या हरकतींवर येत्या २८ जुलैपर्यंत सुनावणी घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.