पिंपरी : जास्त परताव्याच्या आमिषाने ऑनलाइन पद्धतीने पैसे गुंतवणूक केलेल्या संगणक अभियंत्याची ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार जुनी सांगवीत उघडकीस आला. याप्रकरणी ५४ वर्षीय अभियंत्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. समूहातील लोकांना गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळत असल्याची माहिती दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने ३१ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली. तसेच आणखी एक अॅप डाऊनलोड केले. अॅपच्या माध्यमातून फिर्यादीला १७ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. पैसे परत न देता एकूण ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करित आहेत.
पिंपरीत बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक
पिंपरीतील, संत तुकारामनगर येथील एका सहकारी बँकेचे व्यवस्थापक, कॅशियरने कर्ज देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील धानोरीत राहणाऱ्या व्यक्तीने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँकेचे व्यवस्थापक, कॅशिअरसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीच्या धानोरी येथील प्लॉठ गहाण ठेवण्यास सागितले. सहा गुंठे प्लॉटपैकी तीन गुंठे प्लॉट गहाण ठेवणे अपेक्षित असताना, फिर्यादीची दिशाभूल करून संपूर्ण सहा गुंठे प्लॉट गहाणखत करून घेतले. तसेच, कॅशियरने फिर्यादीकडून प्रक्रिया, सभासद फी आणि मूल्यांकन फीच्या नावाखाली तीन धनादेश घेतले. त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून आरोपीने सेल्फ म्हणून बँकेत टाकला. फिर्यादीची एकूण ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करित आहेत.
मोशीत पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी प्राधिकरण येथे एका तरुणाला अवैधपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. सुरज राजू गिराम उर्फ डोंगरे (२०, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई हर्षद कदम यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मागील बाजूला सुरज पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सुरज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.