पुणे : शहरात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी शिरले आणि नागरिकांना स्थलांतर करावे लागले. अशा घटना वारंवार घडत असून, पुण्यातील पुराचा धोका गेल्या १४ वर्षांत ७४ टक्क्यांनी वाढल्याचा दावा शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केला.

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीमधून ही बाब उघडकीस आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, सन २०११ मध्ये मुठा नदीची प्रवाह क्षमता ५४८.४५ घनमीटर होती, तर २०२४ मध्ये बंधाऱ्यांमुळे प्रवाह क्षमता ४८५.४५ घनमीटर इतकी झाली आहे. म्हणजेच, नदीपात्राच्या प्रवाह क्षमतेत ६३ घनमीटरची घट झाली आहे.

यादवाडकर म्हणाले, ‘पुण्यात येणाऱ्या पुराची मूळ कारणे शोधण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर माहिती अधिकारातून माहिती मिळाली. या माहितीमधून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या १४ वर्षांत पुण्याचा पुराचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडगार्डन बंधाऱ्याजवळ निळ्या पूररेषेची पातळी ५४२.४५ मीटर आहे. म्हणजे बंडगार्डन बंधाऱ्यापाशी १,१८,००० क्युसेकचा प्रवाह ५४२.४५ मीटरची पातळी न ओलांडता वाहून गेला पाहिजे. प्रत्यक्षात जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार परिस्थिती अतिशय गंभीर आहे.’

जी पातळी १,१८,००० क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर गाठली जाणे अपेक्षित आहे, ती त्यापेक्षा कमी पातळी सोडूनही गाठली जात आहे. ‘गेल्या वर्षी २५ जुलै २०२४ ला सकाळी ८ वाजता बंडगार्डन येथे ६९ हजार १११ क्युसेक प्रवाह होता. मात्र, या प्रवाहाने ५४२.६० मीटरची पातळी गाठली होती. त्याच दिवशी सायंकाळी ८८ हजार ८८८ क्युसेकचा प्रवाह ५४३.४० मीटरच्या पातळीला पोहोचला. या घटनेतून पुराचा धोका किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले,’ असे विवेक वेलणकर म्हणाले.

नदीपात्रातील अतिक्रमणे, बंधाऱ्यांची उभारणी आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पुणेकरांचा पुराचा धोका अधिकच वाढत चालला आहे. तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर पुणेकरांच्या सुरक्षेला मोठे आव्हान उभे राहणार आहे, असा इशाराही या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिला.