पुणे : भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या पिसांची शहरात अवैधरीत्या विक्री करणाऱ्या उत्तर प्रदेशातील ११ जणांविरुद्ध वन विभागाने वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नरपतगिरी चौक परिसरात (सोमवार पेठ) शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये या टोळीकडून सुमारे पाचशे किलो वजनाची मोरपिसे ताब्यात घेण्यात आली असून, गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

श्रावण महिन्यातील विविध सण, तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये गृहसजावटीसाठी मोरपिसांना सर्वाधिक मागणी असते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची विक्री केली जाते. हे ध्यानात घेऊन अवैधरीत्या मोरपिसांची विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून वन विभागाने मोरपिसे जप्तीची कारवाई केली.

शहरात मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची वाहतूक होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्याआधारे वन विभागाच्या फिरत्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांवर कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या विक्रेत्यांकडे चौकशी केल्यानंतर आरोपींनी संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये मोरपिसांचा साठा केला असल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने पाहणी केली असता, तेथे सुमारे चारशे ते पाचशे किलो वजनाची मोरपिसे साठवली असल्याचे आढळले. हा मुद्देमाल ताब्यात घेऊन विभागाने अकरा जणांवर कारवाईचा बडगा उगारला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुटी मोरपिसे, मोरपिसांच्या शोभेच्या वस्तू आहेत.

पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) हृषीकेश चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, सुरेश वरक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन विभागाच्या फिरत्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. – मनोज बारबोले, वन परिक्षेत्र अधिकारी.