पुणे : यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी काटेकोर नियोजन करून सर्व मानाच्या आणि प्रमुख मंडळांना ठरावीक वेळापत्रक दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक मंडळांनी या वेळापत्रकाचे पालन केले नाही. विसर्जन मिरवणुकीत मंडळे उशिरा सहभागी झाल्याने पोलिसांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे मिरवणुकीचा वेग मंदावला, तसेच पोलिसांना अपेक्षित असलेल्या वेळेत पुढील मार्गावर मंडळांना पोहचणे शक्य झाले नाही.

यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास आधी झाला. पोलिसांनी मानाच्या मंडळांना वेळापत्रक ठरवून दिले होते. सुरुवातीच्या काही तासांमध्ये श्री कसबा गणपती आणि श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाने वेळेत प्रस्थान केले.

मात्र, त्यानंतर अनेक मंडळांनी ठरलेल्या वेळेत बेलबाग चौकात पोहोचण्यास उशीर केला. यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले. दुपारी लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीचा वेग कमी झाला. याशिवाय पोलिसांनी मिरवणूक वेळेत पार पडावी म्हणून टिळक पुतळा, मंडई ते बेलबाग चौक या दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई केली होती. वादनाची सुरुवात बेलबाग चौकापासून करावी, असा आदेश देण्यात आला होता. परंतु काही मंडळांनी टिळक पुतळा ते बेलबाग चौक यादरम्यान वादनाला सुरुवात केली. त्यामुळे मंडळांचा वेग कमी झाला आणि गर्दीही वाढली. सायंकाळी सहभागी होणाऱ्या मंडळांनी वेळ पाळली नाही.

वादावादीचे प्रसंग

बेलबाग चौकात लक्ष्मी रस्त्याने येणाऱ्या एका मंडळाला पोलिसांनी जागेवरच थांबण्याची सूचना केली. मात्र, मंडळाचा ट्रॅक्टर आणि पथके त्यांनी बेलबाग चौकात आणले. त्यावेळी टिळक पुतळ्याकडून येणारे जिलब्या मारुती मंडळ लक्ष्मी रस्त्याने सोडण्यात येणार होते. त्यामुळे दोन्ही मंडळांची मिळून एका वेळी पाच पथके चौकात आली होती. त्यामुळे गोंधळाची स्थिती झाली. दरम्यान, अरूण मित्र मंडळ सुमारे दीड तास चौकात मध्यभागी येऊन थांबले होते. एक महिला पोलिस अधिकारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना मंडळाचा ट्रॅक्टर जबरदस्ती पुढे घेण्यात आला.

मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

वेळेत मिरवणूक पुढे सरकावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. त्यांनी मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मंडळांना थांबवून वेळ पाळण्याची सूचना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे काही ठिकाणी मिरवणूक पुढे सरकली, तरी अनेक मंडळांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांचे नियोजन कोलमडले.