पुणे : Ganesh Visarjan Pune Updates : शहरातील जल्लोषमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता उद्या (शनिवारी) अनंत चतुर्दशीला होत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय मदतीसाठी पथके तैनात केली आहेत.
आरोग्य विभागाने विसर्जन मार्ग व घाटांवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तैनात केले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे. महापालिकेकडून १५ वैद्यकीय पथके, ८० वैद्यकीय अधिकारी आणि सुमारे २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथके नेमली असून, परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी समन्वय साधणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोरील बेलबाग चौकात विशेष आरोग्य कक्ष ११ दिवसांपासून सुरू आहे, या कक्षात तीन अतिदक्षता (आयसीयू) रुग्णशय्यांसह आपत्कालीन सेवा ७ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य शिबिराचा आतापर्यंत २ हजारांहून अधिक नागरिकांना फायदा झाला आहे. तसेच, पुणे महापालिका आणि ना.पै. मुरलीधर अण्णा मोहोळ विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्सिजन रुग्णशय्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विसर्जनाच्या दिवशी शनिवारी तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी १२ आरोग्य विभागाचे १२ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यात येणार असून, कमला नेहरू रुग्णालयात १० रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उद्या सुटी असली तरी जवळपास ३०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. महापालिकेच्या आणि १०८ क्रमांकाच्या मिळून ३० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून, तातडीच्या रुग्णसेवेसाठी त्यांचा वापर होणार आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक, मंडळांचे कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील वादक तसेच देखावे सादर करणाऱ्या कलाकारांना तातडीच्या मदतीची आवश्यकता भासू शकते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाकडून आवश्यक वैद्यकीय सुविधा तत्काळ देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. – डॉ. कल्पना बळिवंत, उपआरोग्य अधिकारी, पुणे महापालिका