पुणे : माझ्या मित्राला तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली असून तो गांभीर जखमी झाला आहे. तर या घटनेची पोलिसांना माहिती देणारा मित्रच खूनी निघाला आहे. या घटनेमुळे हडपसर भागात एकच खळबळ उडाली आहे. रविकुमार शिवशंकर यादव वय ३३ असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किसन राजमंगल सहा वय २० मूळचा बिहार असे आरोपीचे नाव असून काळेपडळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मित्र किसन राजमंगल सहा याने आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला की, उंद्री हांडेवाडी येथील साईगंगा सोसायटीच्या समोरील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये माझा मित्र रविकुमार शिवशंकर यादव याला तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आमची टीम काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली आणि रविकुमार शिवशंकर यादव याला जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर आम्हाला या घटनेबाबत माहिती देणारा किसन राजमंगल सहा याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी रविकुमार शिवशंकर यादव याच्याकडे गादी आणि बेड शीट मागितली. त्या वस्तू देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्या तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने त्याला मारहाण केल्याचे सांगितले.
त्या माहितीच्या आधारे आम्ही आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. मात्र त्यामध्ये अशा प्रकारची घटना दिसून आली नाही. त्यावर आम्ही माहिती देणारा किसन राजमंगल सहा याच्याकडे अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्यावर, त्याला पोलीस खाक्या दाखवताच किसन राजमंगल सहा यांनी खून केल्याची कबुली दिली. मी आणि रविकुमार दारू पीत बसलो होतो. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये वाद झाला. तो राग मनात धरून रविकुमार शिवशंकर यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.