पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याबाबचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात काँग्रेस भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, सह प्रभारी बी. एम. संदीप, खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील गटनेते, निरीक्षक सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘पक्ष संघटन बळकट करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची गरज असते. आधी पक्ष आणि नंतर निवडणूक असा विचार होणे आवश्यक आहे. आघाडी केल्याने काही ठिकाणी पक्षाला फटका बसतो. पक्षवाढीसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची, याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहे. याबाबत महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना माहिती देण्यात आली आहे.’
सतेज पाटील म्हणाले, ‘खासदार राहुल गांधी यांनी मत चोरीच्या माध्यमातून खिडकी उघडली आहे, आता आपल्याला दार उघडायचे आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय होणे आवश्यक आहे. पदवीधर आणि शिक्षक विधानसभा मतदार संघांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी संबंधित मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष द्यावे.’
‘राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा करावा’
‘महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. या परिस्थितीत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा करून शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधावा,’ असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
‘लोकसभा निवडणुकीत एकत्र राहून काम केल्याने यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास आणि तिकीट वाटपातील गोंधळामुळे नुकसान झाले. हा गोंधळ जाणीवपूर्वक करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या निवडणुकीत मतचोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मतदार याद्या तपासणे आवश्यक आहे.’ असे खासदार शिंदे यांनी सांगितले.