पुणे : पुणे आणि परिसरात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळी जोरदार पाऊस बरसला. दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पुण्यासह काही जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची उघडीप होती. बुधवारी मात्र सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला. शहराच्या काही भागांत वाहतूककोंडी झाली. अनेक भागांत पावसाचे पाणी साचण्याच्या घटना घडल्या. हडपसर, सिंहगड रस्ता, शहराच्या मध्यवर्ती भागासह बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी अनेक भागांत हलक्या सरी बरसल्या.

दरम्यान, राज्यातील मान्सूनची सीमा स्थिर आहे. गेल्या आठवड्यापासून मान्सूनची प्रगती रेंगाळली आहे. मात्र, मान्सूनच्या पुढील वाटचालीस लवकरच पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील पाऊस

हडपसर : १७.५ मिलिमीटर
शिवाजीनगर : १६.७ मिलिमीटर
पाषाण : १६.७ मिलिमीटर
एनडीए : १६.५ मिलिमीटर
मगरपट्टा : १२.५ मिलिमीटर
लोहगाव : १० मिलिमीटर