पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पवना, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिरातही पवनेचे पाणी शिरले. सखल भागात, तसेच महामार्गावरही पाण्याची तळी साचली. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर वाढल्याने शहरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. मावळात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीतही वाढ झाली. मोरया गोसावी समाधी मंदिरातही पवनेचे पाणी शिरले.

थेरगाव येथील केजूबाई मंदिर, तसेच भोसरी, चिंचवड, पिंपरी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, रावेत, वाकड, भूमकर चौक, प्राधिकरण, निगडी या भागांमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागली. परिसरातील प्रमुख, तसेच अंतर्गत रस्त्यावर नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांची कसरत पाहायला मिळाली. सखल भागात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी साचले.

पवना धरणातील पाणीसाठा ३७ टक्क्यांवर

मावळवासीयांसह पिंपरी-चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणात सध्या एकूण ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आंद्रा धरण ४४.८५ टक्के भरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नदीकाठच्या लोकांनी विशेष खबरदारी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने विनाकारण नदी पूल, नदी घाट, नदी परिसरात गर्दी करू नये. तसेच, पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडू नये. शहरवासीयांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन सज्ज असून, कोणत्याही मदतीसाठी ११२ या क्रमांकाशी संपर्क साधावा. – विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.