पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आलेल्या गुंडाकडून धानोरी जकात नाका भागातील हाॅटेलची तोडफोड केली. गुंडाने हाॅटेल चालकाला धमकावून दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. हाॅटेल व्यवस्थापकाासह मालकाला मारहाण केली. याप्रकरणी गुंडासह आठ जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी सराइत गुंड रोहन अशोक गायकवाड, गणेश राठोड यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत हाॅटेल चालक अन्सार गफूर शेख (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, मारामारी, तसेच खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे विमानतळ आणि येरवडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. २०२२ मध्ये विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर गायकवाड आणि साथीदार येरवडा कारागृहात होते.

हेही वाचा…सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार

गायकवाडने याप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळविला होता. त्यानंतर गायकवाड आणि साथीदारांनी पुन्हा धानोरी परिसरात दहशत माजविण्यास सुरुवात केली होती. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गायकवाड आणि साथीदार धानोरी जकात नाका परिसरातील हाॅटेल अमिरमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्या वेळी तेथे काही तरुण जेवण करत होते. गायकवाड आणि साथीदारांनी हाॅटेलमधील ग्राहकांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी भांडणे सुरू केली. हाॅटेल मालक अन्सार शेख यांनी भांडणे सोडवून गायकवाड आणि साथीदारांना बाहेर जाण्यास सांगितले. गायकवाड आणि साथीदार तेथून निघून गेले.

हेही वाचा…मुळशी धरणग्रस्तांसाठी पुन्हा कारागृहात जाऊ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा

काही वेळेनंतर गायकवाड आणि साथीदार पुन्हा हाॅटेलमध्ये आले. त्यांनी हाॅटेल मालक शेख यांना शिवीगाळ करुन हाॅटेलमध्ये तोडफोड सुरू केली. हाॅटेलचे व्यवस्थापक शरीफ शेख यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. शरीफ जखमी झाले. हाॅटेल मालक अन्सार यांना धक्काबुक्की करुन त्यांना धमकी दिली. हाॅटेल सुरू ठेवायचे असेल, तर दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत. पसार झालेल्या गायकवाड आणि साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.