पुणे : ‘मूर्ती केवळ दगड, धातूने निर्माण केल्या जात नाहीत. त्यात मानवी मनाचे सूक्ष्म कंगोरे साकारले जातात. मूर्तीकाराच्या भावना, विचार देवतेच्या रूपातून व्यक्त होत असतात. काळानुरूप त्यांच्यात बदल होत असतो,’ असे मत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी व्यक्त केले. स्त्रीदेवतांच्या मूर्तीत कार्य-कारणांचे वैविध्य आढळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘इंडी हेरीटेज’ आणि ‘परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन’ यांच्या वतीने ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत ‘स्त्रीदेवतांची रूपे’ या विषयावर डाॅ. देगलूरकर बोलत होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव, ‘इंडी हेरीटेज’चे समन्वयक तुषार जोशी या वेळी उपस्थित होते.
‘इसवीसनपूर्व काळात मातृदेवतांच्या रूपातील स्त्रीदेवता आढळत होत्या. मात्र, काळानुसार बदलणारे मानवी मनाचे भाव, शिल्पकारांचे कौशल्य आणि पुराणकथांचा प्रभाव स्त्रीदेवतेच्या मूर्त्यांमध्येही दिसतो. सुरवातीच्या काळात शास्त्रोक्त, पुराणोक्त आणि सौदर्यशास्त्रीय निकषांनुसार स्त्रीदेवतांच्या मूर्तींची निर्मिती केली जात होती. मात्र, भक्तीची संकल्पना रुजल्यावर या मूर्तींमध्ये वैविध्य निर्माण झाले. विश्वाची निर्माणकर्ती, दुष्टांची संहारकर्ती आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून स्त्रीदेवतांच्या मूर्ती निर्माण झालेल्या आढळतात, असे देगलूरकर यांनी सांगितले.
ते म्हणाले,‘स्त्रीदेवतांमध्ये पार्वती या देवतेचे रूप सर्वाधिक आढळते. पार्वतीची दुर्गा, उमा, महिषासुरमर्दिनी अशी अनेकानेक रूपे शिल्पांकित झालेली दिसतात. तिचे कार्य वेगवेगळे आहे. कधी ती आक्रमक, युद्धसन्मुख तर कधी ती पंचाग्नीसाधना करताना दिसते. सिंहारूढ रूपाने ती दुर्गा म्हणून आढळते. अर्धनारीश्वर या रूपाने ती जीवशिवाच्या ऐक्याचे प्रतीक बनते. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही तिचीच विविध रूपे आहेत. कल्याणकारी, दुष्टसंहार करणारी कालिका, चंडिका आणि बुद्धीमती सरस्वती ही पार्वतीचीच रूपे आहेत.’
‘देवतांबरोबर दिसणाऱ्या स्त्री रूपातील मूर्ती या केवळ त्यांच्या पत्नी नसतात. त्या-त्या देवतेच्या शक्तीचे प्रतीक असतात. सरस्वती ही ब्रह्मदेव किंवा गणपतीची पत्नी नसून, ती त्यांच्या विद्याशक्तीचे प्रतीक आहे,’ असेही देगलूरकर यांनी सांगितले.
‘देवतेच्या प्रतिमांमधून आपण त्याचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करतो. मानवी मनातील भावना, आशा, भीती, विकार यांच्या आधारे त्या प्रतिमांमध्ये अर्थ शोधतो आणि देवतेला तशाच स्वरूपात पाहतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
जोशी यांनी प्रास्ताविक केले. अनुश्री घिसाड यांनी सूत्रसंचालन केले.
प्रत्येक मूर्ती सर्वांनाच समजेल असे नाही. कलाकार आणि अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून तिचा अर्थ आणि भूमिका समजून घ्यावी लागते. – डॉ. गो. बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्र अभ्यासक