पुणे : कोविड १९, झिका विषाणूच्या निदानासाठी आरएनएवर आधारित सेन्सरची संवेदनशीलता वाढवण्याची नवी पद्धती विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या सहकार्याने याबाबतचे संशोधन केले आहे. नव्या पद्धतीमुळे कागदावर आधारित आण्विक निदान चाचणी विकसित होण्याची शक्यता समोर आली असून, ती चाचणी कमी संसाधने असलेल्या ठिकाणी थेट वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.
आयसर पुणेच्या जीवशास्त्र विभागातील डॉ. चैतन्य अठले, तन्वी काळे, रुद्वी पेडणेकर यांच्यासह कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील डॉ. कीथ पार्डी, चिलीतील पॉन्टिफिसिया युनिव्हर्सिडॅड कॅटॉलिका डी, चिली येथील डॉ. फर्नान फेडेरिसी यांच्या संशोधन गटाचा संशोधनात सहभाग आहे. संशोधनाचा शोधनिबंध एसीएस सिंथेटिक बायोलॉजी या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. या संशोधनासाठी शास्त्री इंडो-कॅनेडियन इन्स्टिट्यूट, कॅनडा सरकारच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रीसर्च सेंटर यांच्या समर्थनाने आंतरराष्ट्रीय महासंघाद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
नवी पद्धती विकसित करण्यासाठी टोहोल्ड स्वीचेस हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. यापूर्वी हे तंत्रज्ञान विषाणू आणि रोगजनकांच्या आण्विक स्वाक्षरी शोधण्यासाठी यशस्वी ठरले आहे. ही रचना प्रोग्राम करण्यायोग्य रायबोन्युक्लिक ॲसिड (आरएनए) अनुक्रम असतात. त्यांना विशिष्ट विषाणूची उपस्थिती आढळते तेव्हा ते विशिष्ट एन्झाइम्स, रंगीत सब्स्ट्रेटच्या साहाय्याने रंग तयार करतात. त्यामुळे ही यंत्रणा एक प्रकारचे जनुकीय उपकरण होते. अशा उपकरणांचा उपयोग कमी खर्चात, कमी संसाधने असलेल्या ठिकाणी निदानासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉ. पार्डी यांच्या संशोधन गटाने ब्राझीलमधील झिका विषाणूच्या उद्रेकावेळी दाखवले होते.
मात्र, त्यात असलेली अनेक टप्प्यांच्या प्रक्रियेची मर्यादा दूर करण्यासाठी ‘ट्रान्स्लेशनल एनहान्सर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुजनुकीय अनुक्रमांना टोहोलेड स्विचच्या पुढील भागात समाविष्ट केले. त्यामुळे आरएनए आढळल्यास प्रथिननिर्मिती अधिक प्रमाणात झाली. त्यानंतर सुधारित सेन्सरची चाचणी कोविड १९ आणि झिका विषाणू यांच्या आरएनए अनुक्रमांवर करून ते पेशीविरहित प्रणालीमध्ये यशस्वीरीत्या पडताळून पाहण्यात आले. ही पद्धत अधिक संवेदनशील आणि वेगवान असल्याचे दिसून आले, अशी माहिती आयसरने दिली.
आरएनए सेन्सरद्वारे एका टप्प्यातच चाचणी करणे या संशोधनातून साध्य करण्यात आले. पुढे या पद्धतीने साधने, निधी उपलब्ध झाल्यास साधनांचा अभाव असलेल्या ठिकाणी (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्रे) आणखी बऱ्याच विषाणूंची चाचणी करणे शक्य होऊ शकेल. – डॉ. चैतन्य अठले, शास्त्रज्ञ