अनंत चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिवसभरात शहरात ३ लाख १० हजार १५८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर ४ लाख ४ हजार ३४७ किलो निर्माल्य संकलन महापालिकेकडून करण्यात आले. ६८ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले. कोंढवा-येवलेवाडी, वानवडी-रामटेकडी आणि कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत शुक्रवारी एकाही मूर्तीचे संकलन झाले नाही.

हेही वाचा >>> पुणे : यंदा ध्वनिपातळीने गाठला अतिधोकादायक स्तर ; शासकीय यंत्रणांचे नरमाईचे धोरण

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शुक्रवारी विसर्जन झालेल्या घरगुती गणेश मूर्तींची माहिती देण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेने नदीकाठ परिसरात काही ठिकाणी हौदांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच लोखंडी टाक्या, फिरत्ये हौदांची व्यवस्थाही करण्यात आली होती. याचबरोबरच मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३ लाख १० हजार १५८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ६८ हजार ५४७ मूर्तींचे बांधलेल्या हौदा, १ लाख ३२ हजार ९९९ मूर्तींचे लोखंडी टाक्यात, ४० हजार ५२२ मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करण्यात आले. तर ६८ हजार ९० मूर्तीचे संकलन करण्यात आले. अनंत चतुर्थीदिवशी ४ लाख ४ हजार ३४७ किलो निर्माल्य संकलन करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.