पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. आता दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरणे, प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि पसंतीक्रम भरता येणार असून, १२ ऑगस्टला दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार ४३० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८६ हजार ७९१ जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून (कॅप) भरल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीमध्ये ४२ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील २४ हजार ७१८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी ६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत झालेल्या प्रवेशांची संकेतस्थळावरून माहिती घेतली असता जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर ५ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी राखीव कोट्यातून प्रवेश घेतला. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या, पहिल्या फेरीत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही.
आता दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात ७ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना नवीन अर्ज नोंदणीसह प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. १० ते ११ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी अर्ज करता येईल. तर १२ ऑगस्टला दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्यात येतील. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल. तसेच कोट्यातील जागांची प्रवेश प्रक्रियाही या कालावधीत होईल.
