पुणे : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शहा यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवटक्के यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, लवकरच बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी सोपविण्यात येणार आहे.
हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने सुनील झंवर आणि कुणाल शहा यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस महासंचालकांकडून याबाबतचा चौकशी अहवाल गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता.