पुणे : राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे या भागासाठी वाकड-बालेवाडी भागात स्वंतत्र वाहतूक केंद्र उभारण्याची मागणी आयटीयन्सनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज महाराष्ट्र’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आले आहे. यात फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी म्हटले आहे की, आयटी पार्कमधील कर्मचारी आणि रहिवाशांच्या वतीने आम्ही हे पत्र लिहित आहोत. आयटी पार्कमुळे वाकड, हिंजवडी, माण, म्हाळुंगे, पुनावळे, रावेत, बाणेर, बालेवाडी, औंध आणि आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्याही वाढत आहे.
आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी हे मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर आणि राज्यासह देशातील इतर भागातून स्थलांतरित झालेले आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावर बसची प्रतीक्षा करीत थांबावे लागते. विशेषत: आठवडाखेर आणि सार्वजनिक सुट्यांवेळी महामार्गांवर थांबणाऱ्या बसमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातून कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटंबीय आणि इतर नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होतो.
राज्य सरकारने या बाबींचा विचार करून वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग वाकड आणि बालेवाडी भागातून जात आहे. यामुळे या भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारणे अधिक योग्य ठरेल. या केंद्रातून मुंबईसह राज्यातील इतर भागात जाण्यासाठी प्रवाशांना बस उपलब्ध होतील. त्यातून त्यांना महामार्गांवर बससाठी थांबावे लागणार नाही आणि त्यांच्या प्रवास अधिक सुरक्षित होईल, असेही फोरमने पत्रात नमूद केले आहे.
सार्वजनिक वाहतूक केंद्राचा फायदा
- आयटी पार्कमधील कर्मचारी : आयटी पार्कमध्ये लाखो कर्मचारी काम करीत असून, त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. दुसऱ्या शहरात जाण्यासाठी त्यांना कायम महामार्गांवर उभे राहावे लागते.
- क्रीडाप्रेमी : शिवछत्रपती बालेवाडी क्रीडा संकुलात क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसह अनेक स्पर्धा होतात. या स्पर्धा पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक येतात.
- विद्यार्थी : वाकड, हिंजवडी, बाणेरसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमधील विद्यार्थी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहेत.
- बाणेर, वाकडमधील कर्मचारी – बाणेर आणि वाकड परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. या ठिकाणी सुमारे ६० ते ७० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
- स्थानिक रहिवासी : हिजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूस, पुनावळेसह आजूबाजूच्या परिसरातील लाखो स्थानिक रहिवाशांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध होईल.