पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आल्यानंतर, मागील काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर दररोज नवीन आरोप करत आहेत.

तर त्या सर्व घडामोडी दरम्यान काल मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग ठिकाणी भेट दिली आणि “आपण केलेल्या मागणीनुसार निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर आज जैन समाजाच्या बोर्डिंग या ठिकाणी असंख्य जैन संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर “१ नोव्हेंबर पूर्वी जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही उपोषण करणार,” असल्याचा इशारा आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी दिला होता.

त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आल्यानंतर गोखले बिल्डर्स यांनी “जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा,” अशा स्वरूपाचा मेल एचएनडी यांच्या मेलवर केला आहे. या एकूणच घडामोडीबाबत माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “पुणे शहरातील मॉडेल कॉलनी भागामध्ये जैन समाजाची बोर्डिंगकरिता असलेली साडेतीन एकर जमीन विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला. तो चुकीचा आणि बेकायदेशीर निर्णय होता. त्या व्यवहाराबाबत अनेक दिवसांपासून लढा सुरू होता. तो व्यवहार रद्द करण्यासाठी आज देशभरातील ८६ हून अधिक संघटनांची बैठक झाली.

त्या बैठकीमध्ये एक ठराव करण्यात आला होता, तो म्हणजे जमीन विक्रीचा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा, तसेच गोखले बिल्डर्स यांनी जमीन खरेदीचा निर्णय रद्द करावा, असा विनंती करणारा ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. त्या ठरावानंतर गोखले बिल्डर्स यांनी आमच्या विनंतीला मान दिला.

जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा, अशी विनंती गोखले बिल्डर्सकडून एचएनडी ट्रस्टींना मेलद्वारे करण्यात आली आहे. तसेच, ‘आम्ही ट्रस्टींना ₹२३० कोटी रुपये दिले आहेत, ती रक्कम आम्हाला देण्यात यावी,’ अशी मागणी गोखले बिल्डर्सकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“तसेच ते पुढे म्हणाले, “सध्याच्या घडीला गोखले बिल्डर्स यांचे नाव येथील मालमत्तेवर आहे. जोपर्यंत एचएनडी (HND) यांचे नाव लागत नाही आणि जैन बोर्डिंग पहिल्यासारखे सुरू होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.