पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीच्या (चार्ज फ्रेम) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्याकडून आरोपींविरुद्ध दाखल असलेले आरोप आणि पुराव्यांची माहिती न्यायालयात सादर केली. ॲड. शिरे यांनी न्यायालयात साडेचार तास युक्तिवाद करून खटल्याची माहिती न्यायालयासमोर सादर केली.
कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघातापूर्वी अगरवाल याचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी मुंढव्यातील पबमध्ये मद्यप्राशन केले होते.
अपघातानंतर अगरवालच्या मुलासह दोन मित्रांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आले होते. त्या वेळी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत केले. त्यांच्यामार्फत ससून रुग्णालयातील तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. आशिष हाळनोर आणि न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा तत्कालीन प्रमुख डाॅ. अजय तावरे यांना लाच दिली. पोलीस तपासात या बाबी उघड झाल्यानंतर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील दहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीच्या प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २२६ नुसार ॲड. हिरे यांनी साडेचार तास युक्तिवाद केला. आरोपींनी रक्ताचे नमुने बदलण्याचा कट कसा रचला. साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणी अहवाल, तांत्रिक तपास, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल, रक्तनमुन्यातील फेरफार याबाबतची माहिती ॲड. हिरे यांनी न्यायालयासमोर सादर केली.
डाॅ. हाळनोर आणि डाॅ. तावरे यांनी देण्यात आलेले तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे. बचाव पक्षाकडून याबाबत युक्तिवाद करण्यात येणार आहे. सरकारी पक्ष, तसेच बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोप निश्चित होणार आहे.