पुणे : शहरातील कल्याणीनगर येथील खासगी बंगल्यामधील पब आणि बार अवैध्य नसून महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवश्यक संबंधित परवानगी घेऊनच हाॅटेल आणि बार तसेच परमिट रूम सुरू करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
कल्याणीनगर येथील खासगी बंगल्यामधील अवैधरित्या पब आणि बार सुरू असल्यासंदर्भातील मुद्दा वडगावशेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावर बोलताना फडणवीस यांनी हा दावा केला.
कल्याणीनगर येथील पब आणि बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे आणि त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याची बाब पठारे यांनी उपस्थित केली होती. तसेच वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी पोलीस, महापालिकेचा बांधकाम विकास विभाग, पोलीस प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नसल्याकडेही आमदार पठारे यांनी लक्ष वेधले होते. ‘मात्र यात कोणतेही तथ्य नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मात्र वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रार अर्जानुसार करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले,‘वाहतूक कोंडी आणि अपघातासंदर्भात सन २०२४ मध्ये दोन आणि त्यानंतरच्या वर्षी चार असे एकूण सहा तक्रार अर्ज वाहतूक पोलिसांकडे आले होते. कल्याणीनगर परिसरामध्ये एक जानेवारी ते मे अखेर या कालावधीत नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या ४१८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून २ लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी, चारचाकी, जड, अवजड वाहने, रस्त्याच्या विरूद्ध बाजूने येणे, गाडी चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, ट्रीपलसिट प्रवास आणि नो-एन्ट्रीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३ हजार ३८६ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २६ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.’
कल्याणीनगर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून सेलेब्रियम आयटी पार्क बिल्डिंग क्रमांक तीन ते मेरिगोल्ड सोसायटी रस्त्यापर्यंत्या चारशे मीटर अंतरावर नो-पार्किंग झोन करण्यात आले आहेत. तसेच कल्याणीनगरमधील हाॅटेल, बार मालक आणि व्यवस्थापकांना पार्किंग संदर्भात वेळोवेळी नोटीसा बजाविण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.