पुणे : कोकणातील हापूसचा हंगाम यंदा महिनाभर अगोदर संपला असताना आता कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे कर्नाटक हापूसला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

‘यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूसची लागवड सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाली. वातावरणातील बदलामुळे कर्नाटकातील आंब्यांच्या लागवडीवरही परिणाम झाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम उशिराने सुरू झाला. एप्रिल महिन्यात कर्नाटकातून आंब्यांची तुरळक आवक झाली. मे महिन्यात आंब्याची आवक वाढली. मात्र, पावसामुळे मागणीत पुन्हा घट झाली, तसेच दरही कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना तोटा झाला,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

‘पावसाने उघडीप दिल्यानंतर कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे. कर्नाटकातील तुमकूर भागातून मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. पुणे, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर कर्नाटक आंबा उपलब्ध आहे. पुढील १५ दिवस कर्नाटक आंब्यांचा हंगाम सुरू राहणार आहे. घाऊक बाजारात तीन ते चार डझनाच्या पेटीला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज दहा हजार पेट्यांची आवक होत आहे, तसेच तीन ते चार हजार खोक्यांची आवक होत आहे. मे महिन्यात कर्नाटकातून बाजारात २५ हजार पेट्यांची आवक होत होती,’ असे उरसळ यांनी सांगितले.

पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांत कर्नाटक हापूस मुबलक उपलब्ध आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, पुढील १५ दिवस कर्नाटकातील आंबे बाजारात उपलब्ध राहतील. – रोहन उरसळ, कर्नाटक आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक हापूसचे दर

तीन ते चार डझन पेटी : ८०० ते १२०० रुपये
दोन डझन : ३०० ते ५०० रुपये
पायरी (४ डझन) : ६०० ते ८०० रुपये
लालबाग (एक किलो ) : २५ ते ३५ रुपये
बदाम (एक किलो) : २५ ते ३५ रुपये