पुणे : ‘महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना करताना सर्वच प्रभागांची चुकीच्या पद्धतीने तोडफोड करण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाने यात हस्तक्षेप केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या या प्रारुप प्रभागरचनेबाबत अनेक हरकती आणि सूचना नोंदविल्या जात आहेत. यात बदल न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागू,’ अशी माहिती महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार बापू पठारे, अंकुश काकडे, गोपाळ तिवारी, माजी आमदार दीप्ती चवधरी, अजित दरेकर,रवींद्र माळवदकर यावेळी उपस्थित होते. काँग्रेस भवन येथे ही पत्रकार परिषद झाली.

‘राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपचे पदाधिकारी प्रभाग रचना करताना त्यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता. महापालिकेने निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारुप प्रभागरचनांना झालेला आकार पाहता, हे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले,’ असे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ३, ६, आणि १३ मध्ये नदी तसेच महामार्ग ओलांडून प्रभागरचना करण्यात आली आहे. भाजपच्या एका माजी नेत्याने आपल्या प्रभागात मागासवर्गीय आरक्षण पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे तत्त्व डावलून प्रभागरचनेत मागासवर्गीयांच्या परिसराची तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) कडून करण्यात आला.

‘प्रभागरचना करताना एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत, अशी प्रभागरचना भाजपने केली आहे. यात नागरिकांची सोय पाहिलेली नाही. प्रभागरचनांवर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासक व्यवस्थेत आम्हाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत,’ असे शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने प्रभागरचना केली आहे. प्रभागरचना करताना छोट्या वस्त्या, सोसायट्यांचेदेखील विभाजन करण्यात आले आहे. शेवाळवाडी, फुरसुंगी वडगाव शेरीला जोडले आहे. समाविष्ट गावे आणि खराडी यांचा एक प्रभाग केला आहे. एका प्रभागात ७० हजार, तर दुसऱ्या प्रभागात दीड लाख मतदार आहेत. काही प्रभागात चार पोलिस ठाणी आणि चार विधानसभांची हद्द येत आहे. अनेक प्रभागांत मागासवर्गीयांवर मोठा अन्याय झाला आहे.’

‘शिवणे-उत्तमनगर वारज्याला जोडण्याऐवजी खडकवासल्याला जोडला आहे. हरकती नोंदविण्यासाठी जाणीवपूर्वक गणेशोत्सवाचा कालावधी निवडण्यात आला आहे. चुकीच्या प्रभागरचनेमुळे निवडणुकीनंतर विकासकामांमध्येही अडथळे येतील. येत्या आठ सप्टेंबरच्या आत आम्ही समविचारी पक्ष या प्रभागरचनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करू,’ असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

‘नियमबाह्य पद्धतीने प्रभागरचना करणाऱ्यांना जनता उत्तर देईल. ही प्रभागरचना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून केली आहे. प्रभागरचनेत कोणत्याही बाबतीत समानता नाही,’ असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

‘प्रभागांबाबत हरकती सूचना नोंदविल्यानंतर काय निर्णय होतो, ते पाहू. मात्र, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू,’असे अंकुश काकडे म्हणाले.

दरम्यान, प्रभागरचनेबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाची बैठक झालेली नाही. पक्षाची भूमिका ठरली, की शिवसेनाही हरकती दाखल करील, असा दावा यावेळी उपस्थितांकडून करण्यात आला.