ज्ञानवृद्धी, मनोरंजन अशा दोन्ही पातळ्यांवर उपयुक्त ठरणारे वाचनाचे महत्त्व आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकतो. झोपेचा शत्रू ठरलेल्या आणि तुमच्या-आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ वाया घालवणारा स्क्रिन टाईम. त्याचे दुष्परिणामही आपल्याला माहिती असतात. पण अनेकदा वाईट सवयी पटकन जडतात. या सगळ्या घातक परिणामांपासून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत दूर ठेवण्याबरोबरच वाचनाची सवय वृद्धींगत व्हावी म्हणून पुणे मराठी ग्रंथालयाने नामी युक्ती राबवली. वाचनाकडे अधिकाधिक मंडळींनी वळावे, त्याबरोबरच लेखनाकडेही गांभार्याने पाहावे या विचाराने ग्रंथालयाने राबविलेला अनोखा उपक्रम म्हणजे ‘गोष्टींची डायरी’.

ग्रंथालयाने हा उपक्रम राबविताना ‘गोष्टीच्या डायरीची गोष्ट’ या नाटुकलीचे केलेले लेखन आणि सादरीकरण हा या उपक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता. या नाटुकलीचे लेखन आणि दिग्दर्शन विभावरी भंडारे यांचे होते तर इयत्ता पहिलीपासून अकरावीतील रमा कदम, शर्विल कोल्हे, गार्गी वैद्य, वरद धारणे, सानिया भंडारे या बालकलाकारांनी अगदी सहजतेने हे नाटुकले सादर केले आणि उपस्थितांकडून वाहवा मिळवली.

ग्रंथालयाने राबविलेल्या या उपक्रमाची माहिती आणि वाचनाचे महत्त्व जेव्हा बालकलाकार नाटुकल्यातून सांगत होते, तेव्हा प्रेक्षक काही काळ नक्कीच विचारमग्न झाले असणार, हे नक्की. वाचनाबरोबरच लेखनासाठी प्रोत्साहन देताना दर महिन्याला ग्रंथालयातील सभासदांना दिलेले कल्पक विषय हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य होते. टोपण नाव, रविवार माझ्या आवडीचा, खारीचा वाटा, मिले सुर मेरा तुम्हारा, विक्रम आणि वेताळ, इंद्रधनू, घरचा अभ्यास, आपण यांना पाहिलंत का ?, ग्रंथालयाची सफर असे विषय जानेवारी २०२५ पासून नऊ महिने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात आठ वर्षांपासून ऐंशी वर्षांपर्यंतच्या ११४ जणांनी सहभाग नोंदविला.

वाचनामुळे येणारी समृद्धता आणि लेखनातून व्यक्त होण्याची संधी इतकंच नाही तर आपण जे लिहिले आहे, त्याचे लेखकाकडूनच झालेले सादरीकरण यातून स्वत:पुरते पुस्तक वाचणे, लेखन करणे आणि स्वत:चे लेखन प्रेक्षकांना वाचून दाखवणे अशा त्रिसुत्रीत बांधला गेलेला हा उपक्रम. हा उपक्रम राबविण्यासाठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे, कार्याध्यक्ष श्रीकांत देव आणि कार्यवाह सुधीर इनामदार यांच्याबरोबरच, ग्रंथपाल आणि ग्रंथालयाच्या देव-घेव विभागापासून सर्वचजण कार्यरत होते. त्यामुळेच एक आगळावेगळ्या उपक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी वाचकांना मिळाली. ग्रंथालयाचा दसऱ्याच्या दिवशी ११४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यामुळे ही संख्या म्हणजे एक अनोखा योगायोगच ठरला. या मंडळींनी लिहिलेल्या एकाच विषयावरील पण विविध कंगोरे दर्शविणाऱ्या गोष्टी म्हणजे लिहिणाऱ्यांसाठी पर्वणीच होती. लहानग्यांपासून तरुणाई, प्रौढ, ज्येठांच्या वयोगटाप्रमाणे आणि विशेषतः महिला सभासदांच्या विचारांचा विस्तृत आवाका या गोष्टींमधून मांडण्यात आला होता.

एखाद्या विषयावर कथा मांडणे हे कौशल्याचे काम तर या मंडळींनी केलेच, पण त्यातील काही गोष्टींचे अभिवाचनही वाचनप्रेरणा दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. या अभिवाचनामुळे आपण जे काही लिहिले आहे, त्याचे सादरीकरण करण्याची अनोखी संधी या लेखकांना मिळाली. वर्धापन दिनानिमित्त पतंगाच्या आकारात केलेले प्रमाणपत्र या सर्व लेखकांना देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या सगळ्या उपक्रमामुळे वाचनाकडे अधिकाधिक मंडळी डोळसपणे पाहतील, हा विश्वास पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.