लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पणतसून असलेल्या मुक्ता टिळक यांची पुण्याच्या ५६ व्या महापौरपदी बुधवारी निवड झाली. वॉर्डात लहान-सहान कामे करताना राजकारणात प्रवेश करण्याची संधी त्यांना मिळाली आणि भाजपच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. टिळक हे नाव मागे असले तरी प्रत्येक गोष्ट त्यांना राजकारणात सहजरीत्या मिळालेली नाही. त्यामुळे महापौर पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा तसा संघर्षपूर्णच राहिल्याचे आणि टिळक घराण्याचा राजकीय वारसा पुढे सुरू रहावा या हेतूनचे त्या राजकारणात सक्रिय राहिल्याचे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्ती सांगतात.
नौदलातील निवृत्त अधिकारी वसंत लिमये आणि निवृत्त शिक्षिका वर्षां यांची कन्या मुक्ता या विवाहानंतर टिळक घराण्यात आल्या. त्या उच्चशिक्षित आहेत. फग्र्युसन महाविद्यालयातून ‘मानसशास्त्र’ या विषयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. सुरुवातीच्या काळात मार्केटिंग आणि मार्केट रिसर्च अॅनेलिस्ट म्हणून विविध कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्थान पेट्रोलियम, रिझव्र्ह बॅंक ऑफ इंडिया, किलरेस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. त्यांना माहेरची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. टिळक घराण्यात आल्यानंतर त्यांचा राजकारणाशी संबंध आला. विविध कंपन्यांमध्ये काम करत असतानाच समाजसेवेच्या आवडीमुळे वॉर्डात नागरिकांची लहान-मोठी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. याच कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी खासदार प्रदीप उर्फ दादा रावत यांनी त्यांना निवडणूक लढविण्यास प्रोत्साहित केले. सन २००२ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढविली आणि विजयही मिळविला. त्यानंतर सलग तीन वेळा त्या महापालिकेवर निवडून गेल्या.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पती शैलेश यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. कौटुंबिक जबाबदारी सांभाळतानाच राजकीय क्षेत्रातील कामाला त्या योग्य प्रकारे न्याय देत असल्याचे पती शैलेश सांगतात. नगरसेविका म्हणून प्रथमच निवडून आल्यानंतर महापालिकेतील कार्यपद्धती त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे. सुसंस्कृत, सुविद्य आणि संयमी अशी त्यांची भाजपसह अन्य पक्षातही ओळख निर्माण झाली. लोकोपयोगी कामे करताना वाढलेल्या जनसंपर्कातून पक्षातील अनेक जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळल्या.