पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) केलेल्या कारवाईत जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडाने सहकारनगर पोलीस ठाण्यात पहाटे गोंधळ घातला. विनयभंगाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या गुंडाने पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने बेडीच्या सहाय्याने पोलीस ठाण्यातील टेबलवरील काच फोडली. काचेमुळे त्यांच्या हाताला जखम झाली.
ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. लोंढे, मयूर आरडे आणि आठ ते दहा साथीदारांनी तळजाई वसाहतीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी लोंढेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई केली होती. कारागृहात असलेल्या लोंढेने ‘मकोका’ कारवाईत जमीन मिळविला होता. जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या लोंढेने पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून मध्यरात्री सराईतांची तपासणी करण्यात येत होती. त्या वेळी लोंढे घरात सापडला. त्या वेळी तो नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने पाण्यात मिरची पूड टाकून पोलिसांच्या अंगावर टाकली.
लोंढे याच्याकडे पेपर स्प्रे होता. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्याला पकडून पोलिसांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले. तो पोलिसांना शिवीगाळ करुन मोठ्याने ओरडत होता. पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या होत्या. पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराच्या टेबलवरील काचेवर त्याने बेडी आपटली. काच फुटल्याने त्याच्या हाताला जखम झाली. त्याने पोलीस ठाण्यातील संगणकावर लाथ मारली.
लोंढे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तो पसार झाला होता. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्याने पोलिसांना विरोध केला. त्यांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारला. बेडी घातलेला हात पोलीस ठाण्यातील काचेवर आपटला. काच फुटल्याने त्याला दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी लोंढे याला अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले.