पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसथांब्यांची उभारणी करण्यासाठीचे काम मिळालेल्या ठेकेदाराने महापालिकेच्या पथ विभाग आणि आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता आणि शुल्क न भरता बसथांबे उभारल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित ठेकेरादारवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
‘पीएमपीएल’ने संबंधित ठेकेदाराला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३०० बसथांबे उभारण्याचे काम दिले आहे. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) तत्वावर १५ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे. बसथांबे उभारताना महापालिकेच्या पथ आणि आकाश चिन्ह विभागाची परवानगी आणि याबाबतचे शुल्क महापालिकेकडे भरण्यात आले आहे का, याबाबतची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी माहितीच्या अधिकारात मागविली होती. त्यानुसार ठेकेदाराने परवानगी घेतली नसून शुल्क भरले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. संभूस यांनी सोमवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
‘पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बसथांबे उभारण्यासाठी २०२३ मध्ये ‘पीएमपीएल’ने निविदा प्रक्रिया राबविली हाेती. हे काम एका ठेकेदार कंपनीला मिळाले. या कंपनीचे सध्याचे बदलले आहे. पीएमपीएमएल आणि या ठेकेदार कंपनीमध्ये करार झाला हाेता.
या करारानुसार कंपनीने बसथांबे उभे करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग तसेच इतर विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक हाेते. त्यासाठी संबंधित विभागांकडे शुल्क भरणे गरजेचे हाेते. मात्र, या कंपनीने कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.’ असे संभूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘बस थांबे उभारताना संबंधित कंपनीने परवानगी न घेतल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.’ असे संभूस यांनी स्पष्ट केले.