पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणी प्रश्नाबाबत तक्रारी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ‘ई-मेल’ आयडी तयार केला आहे. या भागातील नागरिकांनी पाण्याबाबतच्या तक्रारी या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांबरोबरच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील गावांमध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन व इतरांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीएकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा >>> मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा

या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी महापालिकांचे आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे.

या समितीच्या बैठकीत या गावातील नागरिकांकडून पाणी प्रश्नाबाबत येणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र ई मेल आयडी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने हा ई मेल आयडी तयार केला आहे. नागरिकांनी पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी waterpil126@punecorporation.org या ई मेल आयडीवर नोंदवाव्यात, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांना आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे.

हेही वाचा >>> आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमआरडीए च्या हद्दीत असलेल्या भागात सुविधा देण्याचे काम पीएमआरडीएचे आहे. मात्र या भागातील नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आवश्यक आणि पुरेसा दाबाने  पाणीपुरवठा देखील या भागात होत नाही. पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या सर्वांना पायाभूत सुविधा पुरविणे हे बंधनकारक आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.