पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिकेच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे आगामी महापालिका निवडणूक होणार असून, २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे पुण्यात ४२ प्रभाग होणार आहेत.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली उरुळी आणि फुरसुंगी ही दोन गावे राज्य सरकारने वगळल्यामुळे प्रभाग रचनेत बदल करावा लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १६६ ऐवजी एक कमी होऊन १६५ होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने वर्तविली आहे.
महापालिकेत ३० लाख लोकसंख्येला १६१ नगरसेवक आणि त्या पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला एका नगरसेवकाची संख्या वाढवली जाते. २०११ मध्ये पुणे शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार होती. नवीन ११ गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आणि त्यानंतर नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांची लोकसंख्या अडीच लाखांच्या आसपास होती. ही एकत्रित लोकसंख्या सुमारे ३५ लाख ५० हजारांच्या जवळपास जाते. त्यामुळे ३० लाखानंतर प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असणार आहे.
नगरसेवक १६६ की १६५?
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद केली. २०२१ मध्ये महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट झाल्याने २०१७ च्या निवडणुकीची प्रभाग रचना बदलावी लागणार आहे. दोन गावे वगळल्याने या गावांतील लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सभासद संख्या १६६ वरून एकने कमी होऊन १६५ होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शेवटच्या प्रभागांत सदस्य संख्या कमी
पुणे शहर तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची २०११ ची लोकसंख्या लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत ४२ प्रभाग असणार आहेत. यामध्ये ४० किंवा ४१ प्रभाग चार सदस्यांचे असण्याची शक्यता आहे. दोन प्रभाग तीन सदस्यांचे किंवा एक प्रभाग दोन सदस्यांचा असू शकतो, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे आदेश राज्य सरकारकडून आले आहेत. याचा अभ्यास करून महापालिका पुढील नियोजन करण्यासाठी सज्ज आहे.- प्रसाद काटकर, निवडणूक अधिकारी, पुणे महापालिका